Monday, 8 August 2011

* तू कॉल करणार होतास *



* तू कॉल करणार होतास *


संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..

भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..

शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..

झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..

सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन....की....आपलं नातं ?

No comments:

Post a Comment