Wednesday 7 September 2011

आभाळाचे कोरे कागद, मी तसेच तयांना पाठविले…!!!

असे विसरले शब्द मजला, जसे ते मजला आठविले
आभाळाचे कोरे कागद, मी तसेच तयांना पाठविले…!!!

असताल तेथुनी द्या लिहुनच,पाउस मजला यारहो
मी अंगणा सांगुन आलोच, अन 'ती'लाही, तैयार हो…!!!

वीज लख्ख-थक्क वारा, ओघळ पाणी लिहा तयातच
ओलाव्याचे उदास रडणे नको अताशा नको उगाचच…!!!

ती गेल्याचे वाटत नाही, अन नाही दुखणे कसले काही
ती सुखात गेली हेच मिळाले, अजुन काही उरले नाही…!!!

फ़क्त विखुरल्या रांगोळीची, ऒळ तेवढी सजवुन द्या
त्याआधी पण पावसात ही, माती जरा भिजवुन घ्या…!!!

वाहतील मग रंग सारेच, तो सफ़ेदही पसरेल थोडा
रंग राहुद्या तसेच वाहते, तो एकटाच पाण्याने खोडा…!!!

तुमच्याविना येईल तसाही, या डॊळ्यानाच पाउस माझा
मग ती म्हणेल आरोपाने, हा मी नसल्याचा गाजावाजा…!!!

म्हणुन सांगतो तिला आठवत, उगाच रडवे लिहु नका रे
उश:प ठरावा तिचा शाप हा, या शब्दांनो परत फ़िरा रे…!!!

 

No comments:

Post a Comment